महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील मल्टीस्टेट पतसंस्थांची लवकरच शिर्डी येथे सहकार परिषद फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे
मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनची २०२१ – २२ वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा नगरमध्ये उत्साहात झाली. यावेळी साधकबाधक चर्चा होऊन सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थाना हून सुरेश वाबळे बोलत होते. यावेळी फेडरेशनचे उपाध्यक्ष प्रा.व्ही.एस.अंकलकोटे, संचालक शिवाजी कपाळे, कडूभाऊ काळे, जयसिंह पंडित, विठ्ठल वाडगे, सौ. धनलक्ष्मी हजारे, सौ. सुलभा गुंड, सुकुमार पाटील, समीर सराफ, मोसिन शेख, जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सबाजीराव गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने राज्यातील सभासद उपस्थित होते. या सभेमध्ये लातूरचे मोहन जाधव यांच्या मल्टीस्टेट पतसंस्था कामकाज या पुस्तकाचे प्रकाशन सकाळ वृत्तपत्राचे संपादक प्रकाश पाटील व सार्वमत वृत्तपत्राचे संपादक अनंत पाटील यांच्या हस्ते झाले. राज्य मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले, राज्य मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे कार्यक्षेत्र स्थापनेपासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्य आहे. मात्र हे कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा, मध्यप्रदेश, गुजराथ, आंध्रप्रदेश व दिल्ली या राज्यांमधील पतसंस्था आपले सभासद होण्यास तयार आहेत. लवकरच याचा प्रस्ताव संबंधित खात्याकडे सादर करणार आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी पदभार घेतल्यानंतर सहकार मंत्रालयात मोठे बदल झाले आहेत. त्यांनी नुकतीच दिल्लीत राष्ट्रीय स्तरावरील सहकारी संस्थांची व्यापक परिषद घेतली. त्या परिषदेत सहभगी होत मी मल्टीस्टेट पतसंस्थांच्या अडचणी व नव्या शाखांना परवानगी, कार्यक्षेत्र वाढवण्याबाबतचे निवेदन दिले होते. त्यावर अमलबजावणी सुरु झाली आहे. लवकच शिर्डी येथे केंद्रीय सहकार मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी व जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या उपस्थितीत महाराष्ट्रा व कर्नाटक राज्यांमधील मल्टीस्टेट पतसंस्थांच्या सहकार परिषदेचे आयोजन करणार आहे. राज्यातील मल्टीस्टेट पतसंस्थांनी केवळ कर्ज देणे व ठेवी घेणे एव्हढेच काम न करता सकाजिक जाणीवेतून करोना काळात, दुष्काळी काळात व इतर संकट काळात नागरिक व ग्राहकांना केलेली मदत, शैक्षणीक कार्य, सर्वसामान्यांना उभे करण्यासाठी केलेल्या कार्याची सविस्तर माहिती वर पर्यंत जावी, मल्टीस्टेट पतसंस्थांबाबत निर्माण झालेले गैरसमज दूर व्हावेत हे या सहकार परिषदे मागचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती यांनी दिली.
चेअरमन सुरेश वाबळे पुढे म्हणाले, इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्रात मल्टीस्टेट पतसंस्थांचे खूप चांगले काम चालू आहे. मल्टीस्टेट पतसंस्थांची चौकशी व १०८ ची तपासणी सिए कडून झाली पाहिजे अशी मागणी फेडरेशन करत आहे. मल्टीस्टेट पतसंस्थांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून काळानुसार बदल केले पाहिजे. लवकरच येणाऱ्या नव्या मल्टीस्टेट कायद्यात आपल्या बऱ्याचश्या प्रलंबित मागण्या मान्य होतील अशी अपेक्षा करतो.
उपाध्यक्ष प्रा.व्ही.एस.अंकलकोटे म्हणाले, मल्टीस्टेट पतसंस्था या सामाजिक जाणीवेतून काम करत कर्ज देताना समोरच्याची नीतिमत्ता पाहत आहे. ग्रामीण भागासाठी या पतसंस्था वरदान ठरत आहेत. देशात रुपयाचे अवमूल्यन सहकारी व मल्टीस्टेट पतसंस्थाच थांबवू शकतात म्हणून केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी पतसंस्था चळवळीला पाठबळ दिले आहे. सभेचे सूत्रसंचालन संचालक रवींद्र कानडे यांनी केले, आभार उद्धवराव नेवसे यांनी मानले. आदिनाथ शिंदे, नकुल कडू व राजेंद्र हजारे, श्री.गावडे सर, शिवाजी बनकर, बजरंग तनपुरे, प्रदीप थोरवे, बाजीराव पानमल यांनी यावेळी विविध विषय मांडले.

News Date :- 30 Sep 2022